माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित (मे १५इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.
माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान (हिंदी चित्रपट)" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.
इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.
इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७ च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.
माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया(याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.
१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.[१]

No comments:

Post a Comment